नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा 16वा हंगाम 31 मार्च 2023 पासून सुरू होत आहे. कर्णधारपदाबाबत दिल्ली कॅपिटल्ससमोर मोठा पेच निर्माण झाला होता. कारण भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत हा दिल्लीची जबाबदारी सांभाळत होता. परंतु, त्याच्या अपघातामुळे दिल्ली कॅपिटल्समधील त्याची जागा रिक्त झाली होती. दिल्ली कॅपिटल्सच्या व्यवस्थापन समितीसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, आता ती अडचण दूर झाली आहे. फ्रँचायझीने या स्पर्धेसाठी आपला नवा कर्णधार जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर कर्णधारपदी :ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वार्नरला कॅप्टन बनवण्याचा निर्णय घेतला. पंतला पूर्णपणे सावरायला अजून वेळ लागणार आहे. यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ आपल्या कर्णधाराच्या शोधात होता. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आता दिल्ली कॅपिटल्सची जबाबदारी सांभाळणार आहे. यासोबतच टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल संघाचा उपकर्णधार असणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने घेतला निर्णय :भारतीय संघातील तरुण खेळाडू ऋषभ पंत आपल्या संघात आता नसणार यामुळे दिल्ली कॅपिटल्सच्या मालकाने हा निर्णय घेतला. आयपीएल 2022 मध्ये ऋषभ पंतने टीम इंडियाचे नेतृत्व केले होते. त्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सने 5व्या क्रमांकावर राहून स्पर्धा संपवली. ज्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने 14 सामन्यांपैकी सुमारे 7 सामने जिंकले. याशिवाय 7 सामने हरले. आता IPL 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी कशी असेल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.