पॅरिस - तिरंदाजी विश्वकप स्पर्धेत शानदार प्रदर्शन करणारी भारताची स्टार तिरंदाज दीपिका कुमारी जगातील नंबर वन खेळाडू ठरली आहे. पॅरिसमध्ये आयोजित तिरंदाजी विश्वकप स्पर्धेत दीपिकाने तीन सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला.
तिरंदाजी विश्वकपमध्ये दीपिकाने महिला संघासोबत मेक्सिकोच्या संघाचा ५-१ ने धुव्वा उडवत सुवर्णपद जिंकले. त्यानंतर तिने तिचा पती अतानू दास याच्यासोबत मिश्र रिकर्व इव्हेंटमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. इतकेच नव्हे तर दीपिकाने एकेरीत देखील रुसच्या एलिना ओसिपोवा हिचा ६-० ने एकतर्फा पराभव करत सुवर्णपदाची कमाई केली.
टोकियो ऑलिम्पिकआधी दीपिकाची ही कामगिरी भारतीयांची आशा वाढवणारी आहे. या वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान टोकियो ऑलिम्पिक होणार आहे.
दीपिकाने तीन सुवर्णपदक जिंकल्यानंतर विश्व तिरंदाजीच्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन, ती विश्व तिरंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचल्याचे सांगण्यात आले. दीपिका क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचल्याचे कळताच सोशल मीडियावर चाहत्यांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
विश्व तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर दीपिकाने सांगितलं की, मी खूप खुश आहे. त्यासोबत हे प्रदर्शन पुढे देखील कायम ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. यात आणखी काही सुधारणा मी करू इच्छित आहे. कारण आगामी टोकियो ऑलिम्पिक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ऑलिम्पिकसाठी मी खूप उत्सुक आहे.
हेही वाचा -'टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला ३ कोटी रुपये देणार'
हेही वाचा -नेमबाजी विश्वकप : महाराष्ट्र कन्या राही सरनोबतचा 'सुवर्ण' वेध