नूर सुल्तान - सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दीपक पुनियाने रौप्यपदक पटकावले. डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्याने अंतिम सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न धूळीस मिळाले आहे.
हेही वाचा -
दीपकने ८६ किलो वजनी गटातून अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम सामन्यात त्याला इराणचा ऑलिम्पिक विजेता खेळाडू हसन याझदानी यांच्याशी खेळावे लागणार होते. मात्र, दुखापतीमुळे तो सामना खेळू शकला नाही.
दीपकचा उपांत्य फेरीचा सामना स्वित्झर्लंडच्या स्टीफन रेचमुथ याच्याशी झाला. या सामन्यात त्याने स्टीफनचा ७-६ ने पराभव केला. स्पर्धेत दीपकच्या पदकासह भारताने ४ पदके जिंकली आहेत. यात विनेश, बजरंग, रवी कुमार यांच्यासह आता दीपकच्या पदकाचा समावेश आहे.
महाराष्ट्राचा राहुल आवारे उपांत्य फेरीत पराभूत -
भारताचा प्रतिभावान कुस्तीपटू राहुल आवारे याला विश्व कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. राहुलला ६१ किलो वजनी गटात जॉर्जियाच्या बेका लोमताझ याने पराभूत केले. या पराभवाबरोबर राहुलचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले आहे.
दरम्यान, राष्ट्रकुल सुवर्णविजेत्या राहुलने फ्री स्टाईल प्रकारातील ६१ किलो वजन गटात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत यजमान कझाकिस्तानच्या कुस्तीपटू कलियेव्ह याचा १०-७ अशा फरकाने पराभव केला होता.