नवी दिल्ली - पॅरालिम्पिक गेम्समध्ये पदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू दीपा मलिक यांची भारताच्या पॅरालिम्पिक समितीच्या (पीसीआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, ही निवडणूक उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सुनावणीनंतरच वैध ठरणार आहे.
रिओ ऑलिम्पिकमधील गोळा फेक (एफ-53) स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्या ४९ वर्षीय दीपा यांना शुक्रवारी बेंगळुरू येथे झालेल्या निवडणुकीत बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. या नियुक्तीसाठी दीपा यांनी ट्विटवरून आभार मानले आहेत. 'माझ्यासाठी ही मोठी संधी असेल. मी आशा करतो की तुमचा पाठिंबा मला नेहमी असेल. मी माझ्या कर्तव्यासाठी नेहमी तत्पर असेन', असेही दीपाने म्हटले आहे.