नवी दिल्ली: भारताचा नवोदित जलतरणपटू वेदांत माधवनने ( Swimmer Vedanta Madhavan ) आपला शानदार फॉर्म सुरू ठेवत कोपनहेगनमधील डॅनिश ओपनमध्ये पुरुषांच्या 800 मीटर फ्रीस्टाइल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. सोळा वर्षीय माधवनने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आणि 8:17.28 अशी वेळ नोंदवली. त्याने स्थानिक जलतरणपटू अलेक्झांडर एल. ब्योर्नचा 0.10 सेकंदांनी पराभव केला.
वेदांतने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले ( Vedanta Madhavan Won Gold Medal ) असले तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो खूप मागे आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमेरिकेच्या रॉबर्ट फिन्केने ( Robert Finke ) 7: 41.87 अशी वेळ नोंदवली. जागतिक विक्रम 7:32.12 आहे. प्रसिद्ध अभिनेते आर माधवन यांचा मुलगा वेदांतने मात्र त्याच्या कामगिरीत बरीच सुधारणा केली आहे. त्याची कामगिरी स्पर्धा दर स्पर्धेनुसार चांगली होत आहे.