अहमदाबाद -सततचे आक्रमण, चढाया आणि डावपेच या सर्वांची मेळ असलेली प्रो कबड्डी स्पर्धा आज निरोप घेणार आहे. ट्रांस्टेडिया क्रीडा संकुलात आज होणाऱ्या महामुकाबल्यासाठी दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स संघ आपापसांत भिडणार आहेत. या दोन्ही संघांना प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद मिळवता आलेले नाही. त्यामुळे आज कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -..तर, शास्त्री मुर्खांच्या राज्यात जगत आहेत, गांगुलीचे वक्तव्य
उपांत्य फेरीच्या सामन्यात दबंग दिल्लीने बंगळुरु बुल्सला मात दिली तर, बंगाल वॉरियर्सने यू मुम्बाला पछाडले होते. यंदाच्या कबड्डीच्या हंगामात दिल्लीने जबरदस्त प्रदर्शन केले आहे. दिल्लीचा स्टार खेळाडू नवीन कुमारने २१ सुपर-१० मिळवले असून आजच्या सामन्यासाठी बंगाल विरूद्धची त्याची खेळी महत्वपूर्ण ठरणार आहे.
दुसरीकडे, बंगालसाठी वाईट बातमी म्हणजे त्याचा कर्णधार मनिंदर अंतिम सामन्यातही खेळू शकणार नाही. दिल्लीसारख्या मजबूत संघासमोर मनिंदरची अनुपस्थिती बंगालसाठी अडचण ठरू शकते. मनिंदरचीच्या अनुपस्थितीत सुकेश हेगडे, के.के. प्रपंजन आणि मोहम्मद नबिबक्ष यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.
दिल्लीचा बचावपटू विशाल माने कारकीर्दीत पाचव्यांदा अंतिम सामन्यात खेळणार आहे. विशालला पकडीच्या गुणांचे द्विशतक गाठण्यासाठी तीन गुणांची आवश्यकता आहे. तर, बंगालचा जीवा कुमार कारकीर्दीतील चौथ्या अंतिम सामन्यात खेळणार आहे.