टोकियो - पुढील वर्षी जपानमध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मुख्य स्टेडियमचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या मुख्य स्टेडियमचे नाव राष्ट्रीय स्टेडियम आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे मुख्य ठिकाण असलेल्या नवीन राष्ट्रीय स्टेडियमचे बांधकाम अधिकृत उद्घाटनाच्या अवघ्या एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले असल्याचे जपान स्पोर्ट्स कौन्सिलने मंगळवारी सांगितले आहे.
हेही वाचा -दिग्गज स्मिथला बाद करण्यासाठी मिसबाहने आखलीय 'एक' रणनीती
एका मीडियासंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या स्टेडियमचे उद्घाटन २१ डिसेंबरला अधिकृतपणे होणार असून त्याचे अंतिम बांधकाम मागील आठवड्याच्या गुरुवारी पूर्ण झाले होते. आता या बांधकामाची अंतिम तपासणी बाकी आहे. या राष्ट्रीय स्टेडियममध्ये ६० हजार लोकांची आसनव्यवस्था असून स्टेडियमचे डिझाइन जपानी वास्तुविशारद केन्गो कुमार यांनी केले आहे. या स्टेडियममध्ये खेळांचे उद्घाटन व समापन समारंभ होणार आहेत. शिवाय, अॅथलेटिक्स आणि फुटबॉलचे सामने येथे होणार आहेत.
या स्टेडियमच्या बांधकामाची किंमत २.०९ अरब अमेरिकी डॉलर्स आहे. पुढील वर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत, तर २५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल.