महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

खेळाडूंना 30 लाखांपर्यंत मानधन तर पर्रीकरांच्या नावाने बुद्धिबळ स्पर्धा खेळवणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - players

गोव्यात होणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रँडमास्टर खुली बुद्धिबळ स्पर्धा यापुढे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने खेळविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

यापुढे खेळाडूंना 30 लाखांपर्यंत मानधन देणार - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By

Published : Jul 26, 2019, 6:45 PM IST

पणजी -गोवा सरकार यापुढे खेळाडूंना 30 लाख रुपयांपर्यंत मानधन देणार असून ते दरवर्षी 10 मुलांना देण्यात येणार आहे. तसेच गोव्यात होणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ग्रँडमास्टर खुली बुद्धिबळ स्पर्धा यापुढे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाने खेळविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली.

स्वीमिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेल्या श्रुगी बांदेकर आणि सोहन गांगुली तर डायव्हिंगमध्ये मेगन आल्मेदा आणि माया शानभाग यांनी मिळविलेल्या यशाबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारा स्क्वॅशपटू यश फडते यांच्या अभिनंदनाचा ठराव भाजप आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी मांडला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, 'गोमंतकातील खेळाडूंना सरकार प्रोत्साहन देत आहे. या वर्षी अनुरा प्रभुदेसाई (बँडमिंटन), कात्या कुएल्हो (विंड सर्फिंग), राहुल प्रभूदेसाई (एव्हरेस्ट चढाई) आणि यश फडते (स्क्वॅश) यांना मदत केली आहे.'

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केवळ देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना सरकारने आर्थिक पाठबळ द्यावे, अशी मागणी केली. त्यावर बोलताना क्रीडामंत्री मनोहर आजगावर म्हणाले, 'सरकार खेळाडूंना न्याय देणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी खेळासाठी अंदाजपत्रक वाढवून द्यावे, अशी आशा आहे. जर क्रीडा क्षेत्रावरील खर्च वाढविला तर आरोग्यावरील खर्च कमी होईल. ज्यामुळे लोक तंदुरुस्त राहण्यास मदत होईल.'

तर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना आजगावकर म्हणाले, 'गोव्यात सुविधा नसताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलपटू तयार झाले. परंतु, आज सुविधा असूनही फुटबॉलपटू घडतात दिसत नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, 'खेळाडू आहेत. पण सरकार निधी देत नाही.'

ABOUT THE AUTHOR

...view details