कॅलगरी (कॅनडा) :भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने गतविजेत्या चीनच्या ली शी फेंगचा 21-18, 22-20 असा सरळ गेममध्ये पराभव करत कॅनडा ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे, लक्ष्य सेनने त्याच्यापेक्षा वरचढ खेळडूचा पराभव करत खिताब जिंकला आहे. जागतिक क्रमवारीत लक्ष्य सेन सध्या 19 व्या क्रमांकावर असून ली शी फेंग 10 व्या क्रमांकावर आहे.
लक्ष्य सेनचे कारकीर्दीतील दुसरे विजेतपद : लक्ष्यने राउंड ऑफ 32 मध्ये जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या कुनलावुत विटिडसॉर्नचा पराभव केला होता. तर सेमीफायनल मध्ये जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानी असलेल्या जपानच्या केंटो निशिमोटोचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेनचे हे दुसरे BWF वर्ल्ड टूर विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने जानेवारी 2022 मध्ये इंडिया ओपन स्पर्धा जिंकली होती.
पी. व्ही. सिंधूचा पराभव : दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूला मात्र या स्पर्धेत निराशा हाती आली आहे. तिला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून 14-21, 15-21 असा सरळ सेटमध्ये पराभव पत्करावा लागला.