नवी दिल्ली -विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलेला भारताचा स्टार बॉक्सिंगपटू अमित पांघल आणि संजीत यांनी कोरोना ब्रेकनंतरच्या पहिल्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहेत. अमितने ५२ किलो तर, संजीतने ९१ किलोच्या गटात ही कामगिरी केली. या दोघांनी फ्रान्सच्या नॅन्टेस येथे सुरू असलेल्या अॅलेक्सिस व्हेस्टिन आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
अमितने शुक्रवारी रात्रीच्या सामन्यात अमेरिकेच्या रेने अब्राहमचा ३-० असा पराभव केला. तर, इंडिया ओपन सुवर्णपदक विजेता संजीतने फ्रान्सच्या सोहैब बुफियाचा पराभव केला. भारताकडून सुवर्णपदक जिंकल्यानंतर अमित पांघलने आनंद व्यक्त केला आहे. हे पदक त्याने आपले प्रशिक्षक अनिल धनकर यांनाही अर्पण केले.