महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Bobby Charlton Death : इंग्लंडला विश्वचषक जिंकवून देणाऱ्या महान खेळाडूचं निधन - बॉबी चार्लटन यांचं निधन

Bobby Charlton Death : इंग्लंडला १९६६ चा फिफा विश्वचषक जिंकवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारे खेळाडू सर बॉबी चार्लटन यांचं शनिवारी निधन झालं. त्यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोर्तुगालविरुद्ध दोन गोल केले होते.

Bobby Charlton
Bobby Charlton

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 5:38 PM IST

लंडन Bobby Charlton Death : इंग्लंडच्या १९६६ फिफा विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य आणि जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचे ​​दिग्गज खेळाडू सर बॉबी चार्लटन यांचं शनिवारी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. १७ नोव्हेंबर रोजी इंग्लंड विरुद्ध माल्टा सामन्यापूर्वी ऐतिहासिक वेम्बले स्टेडियमवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

विश्वचषक जिंकवण्यात मोठी भूमिका बजावली : बॉबी चार्लटन यांनी इंग्लंडसाठी १०६ सामन्यांमध्ये ४९ गोल केले. तर मँचेस्टर युनायटेडसाठी १९५६ ते १९७३ दरम्यान खेळताना ७५८ सामन्यांत २४९ गोल केले. जवळपास ४० वर्षे इंग्लंडसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. कालांतरानं हा विक्रम वेन रुनीनं मोडला. बॉबी चार्लटन इंग्लडच्या १९६६ विश्वचषक विजेत्या संघाचे महत्वाचे सदस्य होते. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोर्तुगालविरुद्ध दोन गोल करत त्यांनी इंग्लंडला अंतिम फेरीत नेण्यात मोठी भूमिका बजावली होती.

कधीही रेड कार्ड मिळालं नाही : मिडफिल्डर म्हणून खेळणारे चार्लटन त्यांचा चपळपणा, जादुई किक आणि वेगासाठी ओळखले जात असे. बॉबी चार्लटन नेहमीच वादांपासून दूर राहिले. मैदानावरही ते अत्यंत क्लिन फुटबॉल खेळले. मँचेस्टर युनायटेडकडून खेळलेल्‍या ७५८ आणि इंग्‍लंडकडून खेळलेल्या १०६ सामन्यांमध्ये त्‍यांना कधीही रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर पाठवलं गेलं नाही.

भयंकर विमान अपघातातून वाचले : १९५८ मध्ये ते एका भयंकर विमान अपघातातून वाचले होते. या अपघातात त्यांचे आठ सहकारी खेळाडू मरण पावले. या घटनेनं संपूर्ण इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेड क्लबला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी चार्लटन फक्त २१ वर्षांचे होते. या घटनेनंतरही त्यांनी फुटबॉलमध्ये जबरदस्त पुनरागमन करत इंग्लंडसाठी तीन विश्वचषक खेळले.

हेही वाचा :

  1. Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर उभारला जाणार सचिनचा भव्य पुतळा! जाणून घ्या कधी होणार उद्घाटन
  2. Rohit Sharma : पंतच्या चुकीनंतरही रोहित सुधारला नाही, पुण्याच्या पोलिसांनी ठोठावला दंड

ABOUT THE AUTHOR

...view details