मुंबई - प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात आज यजमान यू मुंबासमोर गतविजेत्या बंगळुरू बुल्सचे कडवे आव्हान होते. अतिशय रोमांचक झालेल्या या सामन्यात बंगळुरुने ३०-२६ अशा फरकाने विजय मिळवला. बंगळुरुच्या पवन सेहरावतने सामन्यात ११ गुणांची कमाई करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
PRO KABADDI 2019 : अंतिम क्षणात हाराकिरी नडली; यू मुंबाचा बंगळुरुकडून पराभव
मोक्याच्या क्षणी केलेली हाराकिरी यू मुंबाच्या पराभवास कारणीभूत ठरली. बंगळुरुच्या पवन सेहरावतने सामन्यात ११ गुणांची कमाई करत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
पहिल्या सत्राच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी झुंज दिली. बंगळुरुला मुंबावर लोन चढवण्याची चांगली संधी आली होती. परंतु, अभिषेक सिंहने गुण घेत मुंबाला वाचवले. यानंतर, दोन्ही संघात बरोबरीचा खेळ झाला. बंगळुरुने पहिल्या सत्रात मुंबावर १३-११ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला यू मुंबाने २२ व्या मिनिटाला बंगळुरुवर लोन चढवत १६-१३ अशी आघाडी घेतली. परंतु, सामना संपायला २ मिनिट शिल्लक असताना बंगळुरुने मुंबावर लोन चढवत सामन्यात आघाडी घेतली. यानंतर, संघाने आघाडी कायम ठेवताना सामना ३०-२६ असा जिंकला.
बंगळुरू बुल्सकडून पवन सेहरावतने चांगली कामगिरी करताना सामन्यात महत्वाची क्षणी गुण मिळवले. कर्णधार रोहित कुमार अपयशी ठरला. बचावात महेंदर सिंहने ४ गुण घेत चांगली कामगिरी केली. यू मुंबाकडून चढाईत अर्जून देस्वाल ६ गुण, अभिषेक सिंह ५ गुण आणि रोहित बालियानने ३ गुण घेतले. परंतु, मोक्याच्या क्षणी केलेली हाराकिरी संघाच्या पराभवास कारणीभूत ठरली.