नवी दिल्ली :ऑलिम्पिक स्पर्धेत दोन वेळा पदक जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूच्या जागतिक क्रमवारीत घसरण झाली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या जागतिक महिला बॅडमिंटन क्रमवारीत सिंधू पहिल्या 10 मधून बाहेर पडली आहे. भारताची ही स्टार खेळाडू गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ जगातील पहिल्या दहा खेळाडूंमध्ये होती. 27 वर्षीय सिंधूला गेल्या आठवड्यात स्विस ओपनमध्ये महिला एकेरीत पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाचा तिच्या क्रमवारीवर मोठा परिणाम झाला आहे.
सायना नेहवालचीही घसरण :पी. व्ही. सिंधू दोन स्थानांनी घसरून 60448 गुणांसह 11 व्या स्थानावर आली आहे. माजी विश्वविजेती असेलल्या सिंधूने एकेकाळी जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानापर्यंत झेप घेतली होती. नोव्हेंबर 2016 पासून ती जागतिक क्रमवारीत सतत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये राहिली आहे. ऑगस्ट 2013 मध्ये सिंधू प्रथमच जगातील टॉप 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली होती. नव्या क्रमवारीत दिग्गज खेळाडू सायना नेहवाललाही मोठा फटका बसला आहे. ती 36600 गुणांसह 31 व्या क्रमांकावर घसरली आहे. महिलांच्या मिश्र श्रेणीमध्ये त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद 43501 गुणांसह 18 व्या क्रमांकावर आहेत.