मुंबई - भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगाटने विरोधी पक्षाला चांगलेच धारेवर धरलं आहे. तिने पालघर साधू हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर तिने सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणातही करण जोहरसह महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं. आता राष्ट्रीय पुरस्काराच्या नावावर तिने आपला आक्षेप नोंदवला आहे.
बबिता फोगाटने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यात यावे, अशी मागणी केली आहे. खेळांशी संबंधित पुरस्कारांना केवळ महान आणि सन्माननिय खेळाडूंचे नाव देण्यात यावे, देशातील खेळ पुरस्कार राजकीय व्यक्तींच्या नावाने देण्यात येऊ नयेत, असे बबिताने म्हटलं आहे. तिने सोशल मीडियावरुन ही मागणी केली आहे.
बबिताने या संदर्भात ट्विट केले आहे. त्यात तिने, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून त्या पुरस्काराला एखाद्या खेळाडूचे नाव देण्याचा सल्ला तुम्हाला कसा वाटला, असा प्रश्न चाहत्यांना विचारला आहे. याशिवाय तिने आणखी एक ट्विट करत देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार राजीव गांधींच्या नावाने का देण्यात येतात, असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट अगदी खोचक शब्दात केलं आहे.
भारतात उभे राहून राजीव गांधी यांनी थेट इटलीमध्ये भाला फेकला होता म्हणून त्यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार दिला जातो का?, असा टोला बबिताने त्याच्या ट्विटमधून लगावला आहे.
दरम्यान, भारतीय हॉकीत मेजर ध्यानचंद यांनी दिलेलं योगदान लक्षात घेता २९ ऑगस्ट हा दिवस देशात 'राष्ट्रीय खेळ दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वर्षभरात विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. याव्यतिरीक्त खेळाडूंची कारकिर्द घडवणाऱ्या प्रशिक्षकांचाही द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.