मेलबर्न - टोकियो ऑलिम्पिक निर्धारित वेळेत होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे. पण, तुम्ही २०२१ च्या तयारीला लागा, अशा सूचना ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना दिल्या आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पण, अद्याप या प्रकरणी ऑलिम्पिक संघटनेने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
काही तासांपूर्वीच, कोरोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात यावी, या प्रस्तावाला संभाव्य खेळाडूंचा संघ (ग्लोबल अॅथलिट) यांनी पाठिंबा दिला आहे. ग्लोबल अॅथलिट संघाकडून रविवारी यासंदर्भात एक निवेदन पत्र आयओसीला देण्यात आले. यात त्यांनी, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले असल्याने 'आयओसी'नेसुद्धा लवकरच ऑलिम्पिक पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा, असं अपील केलं आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरील (आयओसी) दडपण वाढले आहे.
ऑस्ट्रेलियाने अशात आपल्या खेळाडूंना, टोकियो ऑलिम्पिकला २४ जुलैपासून सुरुवात होणार नाही, हे स्पष्ट दिसत आहे. तरीही तुम्ही २०२१ च्या तयारीला लागा, असे सांगितलं आहे.