नवी दिल्ली : बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत. मात्र, त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाचे दिग्गज खेळाडू मायदेशी परतत आहेत. घरगुती कारणांमुळे कमिन्स मायदेशी परतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सची आई आजारी असल्याची पुष्टी केली आहे. त्यामुळे त्याला मालिकेच्या मध्यावर ऑस्ट्रेलियाला परतावे लागले. त्याच्या जागी स्टीव्ह स्मिथला तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार बनवण्यात आले आहे.
डेव्हिड वॉर्नरही ऑस्ट्रेलियात परतलाय :मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. हा सामना नागपुरात झाला. त्यानंतर दिल्लीत दुसरी कसोटी खेळली गेली, ज्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीतच चेंडू डेव्हिड वॉर्नरच्या हेल्मेटला लागला. तसेच त्याच्या हाताच्या कोपऱ्याला मोहम्मद सिराजचा लागलेल्या चेंडूने मोठी दुखापत झाल्याचे स्कॅनमध्ये निदर्शनास आले. त्याला चेंडू लागल्यानंतर तो सामन्यातून 15 धावांवर परतला. परंतु, नंतर डाॅक्टरकडे केलेल्या चेकअपमध्ये त्याला मोठी दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. त्याला डाॅक्टरांनी रिकव्हरीसाठी विश्रांतीचा सल्ला दिला. डेव्हिड वॉर्नरही प्रकृती अस्वास्थामुळे ऑस्ट्रेलियात परतला आहे. आता पॅट कमिन्सही ऑस्ट्रेलियात परतल्यामुळे स्टीव्ह स्मिथला तिसऱ्या कसोटीसाठी कर्णधार बनवण्यात आले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया संघ इंदूरमध्ये आमने-सामने :तिसऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ इंदूरमध्ये आमने-सामने असतील. हा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान खेळवला जाईल. यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ९ ते १३ मार्चदरम्यान चौथा कसोटी सामना खेळवला जाईल. कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 17 मार्चला वानखेडे स्टेडियमवर, दुसरा सामना 19 मार्चला विशाखापट्टणममध्ये आणि तिसरा सामना 22 मार्चला चेन्नईमध्ये होणार आहे.