नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन वनडे मालिका १७ मार्चपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. झ्ये रिचर्डसन, ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांना ऑस्ट्रेलियाच्या संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियन संघ चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात आला आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली कांगारूंनी दोन कसोटी सामने गमावले आहेत. कसोटी मालिकेतील ऑस्ट्रेलियन संघाच्या अपयशानंतर अॅलेन बाॅर्डरसह, माजी कर्णधार मायकल क्लार्कने टीम ऑस्ट्रेलियावर टीका करीत, कर्णधार पॅट कमिन्सला सल्ला दिला होता. तसेच, ऑस्ट्रेलियाच्या अनेक दिग्गजांनी संघाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून आता संघात बदल करीत दोन अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.
2 अष्टपैलू खेळाडू : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्शचा 16 जणांच्या संघात समावेश केला आहे. दोन्ही अष्टपैलू खेळाडू अनुक्रमे पाय आणि घोट्याच्या दुखापतीमुळे काही काळ संघाबाहेर होते. परंतु आता दीर्घ कालावधीनंतर ते परतत आहेत. हे दोन्हीही खेळाडू अनुभवी आणि उत्तम असल्याने टीम ऑस्ट्रेलियाने संघाची कामगिरी सुधारण्याकरिता त्यांचा समावेश करून घेतला.
दोघेही होते संघाबाहेर : मॅक्सवेल आणि मार्श दुखापतींमुळे 'बिग बॅश लीग'ला पूर्णपणे मुकला होता. T20 विश्वचषकानंतर लगेचच एका घरगुती पार्टीत एका विचित्र अपघातात माजी खेळाडूचा पायाला गंभीर दुखापत झाली होती. दुसरीकडे, मार्शने त्याच्या डाव्या घोट्यावर की-होल शस्त्रक्रिया करून हाडांचे झालेले तुकडे काढून टाकले आणि पायचा कुर्चा दुरुस्त केला. ऑस्ट्रेलियन क्रिकेट राष्ट्रीय निवडकर्त्यांनी वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनचेही स्वागत केले आहे, जो हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने BBL फायनलला जाऊ शकला नाही. तर जोश हेझलवूड दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या नवीन वर्षाच्या कसोटीदरम्यान SCG आउटफिल्डवर धावताना अकिलीसच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
कसोटीतील अपयश : नागपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. त्याचवेळी दिल्लीतील दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने गमावला. यामुळे ऑस्ट्रेलिया संघावर चौफेर टीका झाली. ऑस्ट्रेलियन मीडियासहित क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या कसोटीत टीम इंडियाच्या फिरकीपटूंसमोर टिकाव धरू शकला नव्हता. भारतीय फिरकीपटूंसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फलंदाजी करू शकत नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट निवडकर्त्यांनी अष्टपैलू खेळाडूंचा संघात समावेश केला आहे. तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्चदरम्यान इंदूरमध्ये तर चौथा सामना 9 ते 13 मार्चदरम्यान अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.