महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Asian Games २०२३ : रँकीरेड्डी-शेट्टी जोडीची ऐतिहासिक कामगिरी, आशियाई गेम्समध्ये जिंकलं पहिलं सुवर्णपदक - आशियाई गेम्स

Asian Games २०२३ : भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या स्टार शटलर्सनं आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या जोडीनं आशियाई गेम्समध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं.

Asian Games २०२३
Asian Games २०२३

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 4:04 PM IST

Updated : Oct 7, 2023, 5:22 PM IST

हांगझोऊ (चीन) : भारताच्या सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुषांच्या बॅडमिंटन दुहेरीच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या चोई सोल्ग्यू आणि किम वोंहो यांचा पराभव करून भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिलं. या विजयासह सात्विक-चिराग जोडीनं इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे.

बॅडमिंटनमध्ये भारताचं पहिलं सुवर्णपदक : या आधी २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूनं रौप्य पदक जिंकलं होतं. लेरॉय डिसा आणि प्रदीप गंधे यांनी १९८२ च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर ४१ वर्षांत पुरुष दुहेरीत भारताचं हे पहिलं पदक आहे. या पदकासह आशियाई गेम्समध्ये भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. बॅडमिंटनमध्ये भारतानं तीन पदकं जिंकली आहेत - पुरुष दुहेरी सुवर्ण, पुरुष सांघिक रौप्य आणि पुरुष एकेरी कांस्य.

सरळ सेटमध्ये पराभव केला : भारतीय जोडीनं दक्षिण कोरियाच्या सोल्ग्यु चोई आणि वोन्हो किम यांचा ५७ मिनिटांत २१-१८, २१-१६ असा सरळ सेटमध्ये पराभव करून सुवर्णपदकावर कब्जा केला. पहिल्या सेटमध्ये दक्षिण कोरियाची जोडी १८-१५ अशी आघाडीवर होती. मात्र त्यानंतर भारताच्या या स्टार जोडीनं पुनरागमन केलं. त्यांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन करत सलग सहा गुण जिंकले. अखेरीस पहिला सेट २१-१८ ने जिंकला.

सात्विकसाईराज-चिराग जोडीची ऐतिहासिक कामगिरी : पहिला सेट जिंकल्यानंतर सात्विकसाईराज-चिराग यांनी मागे वळून पाहिलं नाही. दुसऱ्या सेटमध्ये या जोडीनं दक्षिण कोरियाच्या जोडीचा २१-१६ असा सरळ पराभव करत सुवर्णपदक जिंकलं. या दोघांनी या वर्षी आशिया चॅम्पियनशिपचं सुवर्ण, इंडोनेशिया सुपर १०००, कोरिया सुपर ५०० आणि स्विस ओपन सुपर ३०० या स्पर्धा जिंकल्या आहेत.

हेही वाचा :

  1. Asian Games २०२३ : चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी, अंतिम सामन्यात जपानचा धुव्वा उडवला
  2. Cricket World Cup 2023 : ... तो प्रत्येक सामना गांभीर्यानं घेतो'; धोनीच्या बालपणीच्या मित्राची 'ईटीव्ही भारत'ला खास मुलाखत
  3. Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप २०२३ पूर्वी पाकिस्तानचे फक्त २ खेळाडू भारतात आले होते, जाणून घ्या त्यांची नावं
Last Updated : Oct 7, 2023, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details