महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Asian Games 2023 : हॉकीत भारतानं पाकिस्तानला धुतलं, नोंदवला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय - Indian hockey team beat Pakistan

Asian Games 2023 : भारतीय पुरुष हॉकी संघानं शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेत शानदार कामगिरी करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०-२ अशा विक्रमी फरकानं पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगनं सर्वाधिक ४ गोल केले.

Asian Games 2023
Asian Games 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 7:07 AM IST

हांगझोऊ Asian Games 2023 :कर्णधार हरमनप्रीत सिंगनं केलेल्या चार गोलच्या बळावर भारतीय हॉकी संघानं शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पूल 'अ' च्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या विजयासह भारताचं उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झालंय. गोल फरकाच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरील हा सर्वात मोठा विजय आहे.

भारत पूल 'अ' मध्ये अव्वल स्थानी : या सामन्यात भारताचं पाकिस्तानवर पूर्णपणे वर्चस्व राहिलं. हरमनप्रीतनं चार (११' १७' ३३' ३४') गोल केले. तर वरुण कुमारनं दोन (४१' ५४') गोल केले. याशिवाय मनदीप सिंग (८'), सुमित (३०'), शमशेर सिंग (४६') आणि ललित कुमार उपाध्याय (४९') यांनीदेखील गोल केले. पाकिस्तानकडून मोहम्मद खान (३८') आणि अब्दुल राणा (४५') यांनी गोल करून पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. भारतानं सलग चार विजयासह १२ गुण मिळवत पूल 'अ' मध्ये अव्वल स्थान पटकावलंय. आता २ ऑक्टोबरला अंतिम पूल सामन्यात भारतासमोर बांग्लादेशचं आव्हान असेल.

भारत-पाकिस्तान हॉकी इतिहासातील सर्वात मोठा विजय : दोन्ही संघांमधील हा १८० वा सामना होता. विशेष म्हणजे, आठ गोलच्या फरकानं मिळालेला विजय हा भारत-पाकिस्तान हॉकीच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. भारतानं यापूर्वी २०१७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपला सर्वात मोठा विजय नोंदवला होता. तेव्हा भारतानं पाकिस्तानचा ७-१ असा पराभव केला होता. तर १९८२ मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाकिस्ताननं भारताचा एवढ्याच अंतरानं पराभव केला होता.

भारतीय गोलरक्षकाचा शानदार बचाव : सामन्याच्या आठव्या मिनिटालाच टीम इंडियानं आघाडी घेतली. मनदीपनं अभिषेकच्या शानदार पासचं गोलमध्ये रूपांतर केलं. यानंतर पाकिस्ताननं पलटवार करत सामन्याच्या ११ व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र भारतीय गोलरक्षक कृष्ण बहादूर पाठक यानं हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर भारतीय संघानं पेनल्टी स्ट्रोक मिळवला, ज्यावर हरमनप्रीतनं गोल करण्यात कोणतीही चूक केली नाही. सामन्याच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीतनं स्पर्धेतील त्याचा सहावा गोल केला. त्यानं १७ व्या मिनिटाला भारतीय संघाच्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रूपांतर केलं.

मध्यंतरापर्यंत ४-० आघाडी : प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ डावीकडून आक्रमण करत राहिला, पण ते भारतीय संघाच्या गोलपोस्टजवळ पोहोचण्यात धडपडत होते. २८ व्या मिनिटाला पाकिस्तानला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावरही भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशनं अप्रतिम बचाव केला. या क्वार्टरच्या शेवटच्या क्षणांमध्ये सुमितनं रिव्हर्स शॉटवर केलेल्या गोलनं भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. पाकिस्ताननं त्याविरुद्ध रेफरलचा वापर केला तरी त्यांना कोणताही फायदा झाला नाही.

हरमनप्रीतचे चार गोल : मध्यंतरानंतर तिसऱ्याच मिनिटाला पाकिस्तानी खेळाडूच्या चुकीमुळे भारताला आणखी एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावर हरमनप्रीतनं शानदार गोल करत संघाला ५-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर भारतानं एकामागून एक पेनल्टी कॉर्नर मिळवले. हरमनप्रीतनं शानदार ड्रॅग फ्लिकसह सामन्यातील त्याचा चौथा गोल केला. यानंतर वरुण, समशेर आणि ललित यांनीही गोल केले. सामना संपण्याच्या सहा मिनिटे आधी वरुणनं पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup : १९७५ पासून २०१९ विश्वचषकातील कामगिरी; प्रत्येक विश्वचषकात टीम इंडियाची कामगिरी कशी होती? जाणून घ्या सोप्या शब्दात
  2. Cricket World Cup 2023 : विश्वचषकात कोणत्या संघाचं पारडं जड? कोणता खेळाडू ठरू शकतो 'ट्रम्प कार्ड'? जाणून घ्या प्रत्येक संघाबद्दल सविस्तरपणे
  3. Cricket World Cup 2023 : असाही दुर्विलास! एकेकाळच्या विश्वविजेता कर्णधाराला सामना पाहण्यासाठी घ्यावी लागेल तुरुंग अधिकाऱ्यांची परवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details