पुणे- महाराष्ट्र केसरी ही किताबाची लढत आहे. महाराष्ट्रात या स्पर्धेला मान आहे. मात्र कुस्तीपटूंनी फक्त या किताबातच स्वतःला अडकवून ठेवू नये. राष्ट्रीय स्तरावर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांकडे लक्ष द्यावे. नाहीतर भविष्य अंधारात जाईल, असे वक्तव्य अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू आणि प्रसिद्ध कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी केले आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने, महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता शैलेश शेळके तसेच त्यांचे प्रशिक्षक काका पवार यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात काका पवार यांनी कुस्ती समोरील विविध आव्हानांवर भाष्य केले.
महाराष्ट्रातील कुस्तीपटूंविषयी काय म्हणाले काका पवार पाहा... यंदाचा महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि उपविजेता शैलेश शेळके हे दोघेही काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेले मल्ल आहेत. हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याच वेळी मी त्याला आता हे विसरून पुढील तयारीला लागण्याचा सल्ला दिला, असल्याचे काका पवार यांनी सांगितलं.
हर्षवर्धन आता महाराष्ट्र केसरी नाही खेळणार -
हर्षवर्धन आता पुढील महाराष्ट्र केसरी खेळणार नाही, तो ऑलम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांची तयारी करेल, असे काका पवार यांनी स्पष्ट केले. तर उपविजेता शैलेश शेळके मात्र पुढील महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळेल, असे देखील काका पवार यांनी जाहीर केले.
भवितव्य न ठरवल्याने कुस्तीपटूंचे होते गोची -
महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांची परंपरा बघितली तर बोटावर मोजण्या इतकेच कुस्तीपटू पुढे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळताना दिसतात. एकदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावल्यानंतर एक वर्ष तुम्हाला मानसन्मान तसेच काही प्रमाणात पैसा मिळतो. मात्र पुढे काय ? पुढच्या वर्षी नवीन महाराष्ट्र केसरी होतो आणि मागच्याला लोक विसरून जातात. अनेक कुस्तीपटू पुढील दिशा न ठरवल्याने त्याचे भवितव्य अंधारमय होते, अशी अनेक उदाहरणे असल्याचे काका पवार यांनी सांगितले.
उद्योग जगताने कुस्तीसाठी पुढे यावं -
कुस्ती खेळाला महाराष्ट्रात मान आहे. मात्र अजूनही या खेळाला आर्थिक पाठबळ मिळत नाही. हरियाणा सारख्या छोट्या राज्यात कुस्तीपटूंना मिळणारे आर्थिक पाठबळ पाहता, महाराष्ट्राची कुस्ती पुढे न्यायची असेल तर उद्योग जगताने पुढे येण्याची गरज असल्याचे काका पवार यांनी सांगितले.