नवी दिल्ली: जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकत इतिहास घडवला. भारतीय महिला संघाची कामगिरीवर पंतप्रधान मोदी आनंदी झाले असून त्यांनी संघाचे कौतुक केले आहे. त्यांच्या कठोर परिश्रम आणि खेळावरील निष्ठेमुळे हे उत्कृष्ट यश मिळाले असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यातून सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन जणांच्या संघात साताऱ्याची लेक आदिती स्वामीही होती.
तिरंदाज आदिती स्वामी अवघ्या 17 व्या वर्षात चॅम्पियन बनली आहे. दरम्यान बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला एकत्रित संघाने अंतिम फेरीत मेक्सिकोचा पराभव केला. मेस्किकोचा पराभव करत भारतीय महिला संघाने पहिल्यांदा सुर्वणपदक जिंकून इतिहास रचला आहे. ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी परनीत कौर यांनी एकत्रित संघाने हा इतिहास घडवला आहे.
17 व्या वर्षीच साधला चॅम्पियन टायटलवर निशाणा:आदितीने दोन महिन्यांपूर्वीच ज्यूनिअर वर्ल्ड टायटलवर निशाणा साधला होता. आता ती सीनियर चॅम्पियन देखील बनली आहे. 17 वर्षीय आदिती स्वामीने शनिवारी जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या कंपाऊंड(एकत्रित)संघाच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला पराभूत केले. अँड्रियाला पराभूत करत आदितीने सीनियर वर्ल्ड चॅम्पियनचे शीर्षक आपल्या नावावर केले आहे. जुलैमध्ये लिमेरिक येथे झालेल्या 18 वर्षांखालील यूथ चॅम्पियनशिपची स्पर्धेत या साताऱ्याच्या लेकीने 150 गुणांपैकी 149 गुण मिळवले होते. या गुणांसह तिने मेक्सिकन खेळाडूला दोन गुणांनी मात दिली. अँड्रियाने उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान चॅम्पियन सारा लोपेझला नॉकआउट केले होते. पण अँड्रियाला भारतीय खेळाडू आदितीकडून कठीण आव्हान मिळाले.