मुंबई - भारताची अग्रणी महिला गोल्फपटू आदिती अशोक ही सलग दुसऱ्या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता यादीत आदिती अशोकने ४५ वा क्रमांक पटकावला. आदितीच्या आधी अनिर्बान लाहिडी आणि उदयन माने या भारतीय गोल्फपटूंनी टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले आहे. पण आदिती टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची पहिली महिला गोल्फपटू ठरली.
आदिती अशोक हिने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्यानंतर ट्विट करत भावना व्यक्त केल्या आहेत. 'मला वाटत की, रिओ ऑलिम्पिक नुकतेच संपलेलं आहे. भारतासाठी खेळणे हे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. मला ही संधी आणखी एकदा मिळाली आहे.'
दरम्यान, उदयन माने याने अर्जेंटिनामध्ये आयोजित एमिलियानो ग्रिलो स्पर्धेतून माघार घेतली होती. परंतु, त्याला नशिबाची साथ लाभली आणि तो सहा जुलै रोजी टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरल्याचे घोषित करण्यात आले.
आदिती अशोकचे नाव पात्रतेच्या पहिल्या यादीत आले आहे. तर भारताची दुसरी गोल्फपटू दीक्षा डागरचे नाव दुसऱ्या यादीत येऊ शकते. कारण काही खेळाडूंनी ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. यामुळे तिला पाचवी राखीव खेळाडू म्हणून संधी मिळू शकते.