ओमान - भारताचा आघाडीचा टेनिसपटू अचंता शरथ कमलने आयटीटीएफ चॅलेन्जर ओमान ओपन टेबल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. त्याने अंतिम सामन्यात पोर्तुगालच्या अव्वल मानांकित मार्कोस फ्रेटासचा ६-११, ११-८, १२-१०, ११-९, ३-११, १७-१५ असा पराभव केला. तब्बल १० वर्षांचा दुष्काळ संपवत कमलने हे विजेतेपद पटकावले आहे.
हेही वाचा -ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई, देसी अवतारात केला साखरपुडा
२०१० मध्ये कमलने इजिप्त ओपनचे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर तो २०११ मध्ये मोरोक्को ओपन आणि २०१७ मध्ये इंडिया ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. ओमान ओपनच्या उपांत्य फेरीत कमलने रशियाच्या किरिल शाखोवचा पराभव केला. या सामन्यात त्याने दोन सेट गमावले होते. मात्र, अंतिम क्षणी त्याने पुनरागमन करत अंतिम फेरी गाठली.
पोर्तुगालच्या खेळाडू फ्रेटासने उपांत्य फेरीत भारताच्या हरमीत देसाईचा पराभव केला. फ्रेटासने हरमीतचा ५-११, ११-९, ६-११, ६-११, ११-८, १३-११, ११-३ असा पराभव केला होता.