मुंबई -गुजरातमधील वडोदरा येथे पार पडलेल्या पाच राज्यांच्या पश्चिम विभाग शॉटगन शूटिंग स्पर्धेत पालघरच्या अभिषेक पाटील याने सुवर्णकामगिरी केली आहे. त्याने डबल ट्रॅप पुरुष ज्युनियर गटात सुवर्णपदक, डबल ट्रॅप सिनियर पुरुष गटात सुवर्णपदक तर सिंगल ट्रॅप स्पर्धेत ज्युनियर पुरुष गटात कांस्य पदक अशी एकूण तीन पदके पटकावली आहेत.
पालघर जिल्ह्यातील क्रीडा विश्वाचा झेंडा अटकेपार रोवल्याबद्दल अभिषेकचे कौतुक होत आहे. यापूर्वी पुणे येथे झालेल्या राज्य शूटिंग चॅम्पियनशीप ज्युनियर तसेच सिनियर पुरुष गटात अभिषेकने सुवर्णपदक पटकावून आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी अभिषेकची निवड झाली आहे. या स्पर्धेअगोदर, सप्टेंबर महिन्यात जयपूर येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तो भाग घेणार आहे. या स्पर्धेत देखील अभिषेक चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्याच्या पालकांनी व्यक्त केला आहे.