पुणे- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६३ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा यंदा पुण्यात पार पडणार आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रती क्रीडानगरी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी २ ते ७ जानेवारी या दरम्यान रंगणार आहे. नेहमीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. याची माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दिली. ते आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या नवीन लोगोचे अनावरणही करण्यात आले.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा सिटी कॉर्पोरेशनसोबत करार -
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुण्यातील अमनोरा टाऊनशिपच्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडबरोबर ५ वर्षांसाठी करार केला आहे. या अंतर्गत स्पर्धेचे आयोजन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे, स्पर्धेचा स्तर विविध पातळीवर ऊंचवावा, मल्लांसोबतच प्रेक्षकांचाही फायदा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या पत्रकार परिषदेला सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
मागील वर्षी ही स्पर्धा जालना येथे पार पडली होती. या स्पर्धेत बुलडाण्याच्या बाला रफिक शेख याने पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव करत मानाचा महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला. अतिशय काट्याची लढत अभिजित आणि बालामध्ये झाली. पहिल्या काही फेऱ्यानंतर बाला वरचढ ठरला त्याने टाकलेले डाव अभिजितला उलटवता आहे नाही आणि बाला विजेता ठरला.