टोकियो -टोकियो पॅराऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मंगळवारी पार पडणार आहे. या सोहळ्यात भारताच्या सहा अधिकाऱ्यांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय पॅराऑलिम्पिकचे महासचिव गुरूशरण सिंग यांनी याची माहिती आज दिली.
टोकियो पॅराऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात, भारतीय दल 11 जणांचा असणार आहे. यात 6 अधिकारी आणि 5 पॅरा अॅथलिट असतील. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सर्व अॅथलिट्स परवानगी आहे. परंतु, भारताचे आतापर्यंत फक्त 7 अॅथलिट टोकियोला पोहोचले आहेत. यातील पाच जण उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
टोकियोत पोहोचलेल्या सात पॅरा अॅथलिटमध्ये टेबल टेनिसपटू सोनल पटेल आणि भाविना पटेल यांचा समावेश आहे. बुधवारी या दोघींचा सामना आहे. यामुळे त्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. जपानचे सम्राट नारुहितो हे या स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.
भारतीय पॅराऑलिम्पिक समितीचे महासचिव गुरूशरण सिंग यांनी सांगितलं की, उद्घाटन सोहळ्यात केवळ सहा अधिकाऱ्यांना सामिल होण्याची परवानगी आहे. तर कितीही अॅथलिट यात सहभागी होऊ शकतात. त्यांना याची परवानगी आहे. टेबल टेनिसपटूंचे बुधवारी सामने होणार आहेत. यामुळे ते उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.