पणजी -अर्मानियाचा ग्रँडमास्टर तेर-सहख्यान सँमवेल दुसऱ्या गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ठरला आहे. अर्मानियाच्याच पेस्ट्रोस्यान मँनुएलनने दुसरे स्थान प्राप्त केले. तर गतविजेत्या इराणच्या इदानी पोवा याला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.
आर्मानियाचा तेर-सहख्यान सँमवेल ठरला गोवा आंतरराष्ट्रीय खुल्या ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअस स्टेडियममध्ये 18 जूनपासून ही स्पर्धा खेळविण्यात येत होती. आज बक्षीस वितरणासाठी गोव्याचे क्रीडामंत्री मनोहर आजगावकर, गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष तथा वीजमंत्री नीलेश काब्राल, गोवा क्रीडा प्राधिकरणचे संचालक वसंत प्रभूदेसाई आदी उपस्थित होते. गोवा बुद्धिबळ संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले होते.
सँमवेलला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते चषक आणि 3 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. द्वितीय स्थानावरील पेस्ट्रोस्यान मँनुएलन याला चषक आणि 2 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इदानी पोवाला चषक आणि 2 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. या तिघांनी स्पर्धेच्या 10 फेऱ्यांमधून प्रत्येकी 8 गुणांची कमाई केली. रशियाच्या बुर्मकिन ब्लादिमिर याने साडेसात गुणांसह चौथे स्थान प्राप्त केले. त्याला 1 लाख 40 हजारांचा धनादेश देण्यात आला. तर युक्रेनचा तुखेव आदम पाचव्या स्थानी राहिला. त्याला 1 लाख 35 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. पहिल्या 40 स्थानांवरील बुद्धिबळपटूंना रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. यावेळी ब श्रेणीतील विजेत्यांचा बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धा संचालक म्हणून किशोर बांदेकर यांनी काम पाहिले. मुख्य आर्बिटर गोपकुमार, उपमुख्य आर्बिटर इरफान एम. यांच्यासह आर्बिटर म्हणून अरविंद म्हामल, आशिष केणी, सोहनी विवेक सुहास, हेमंत शर्मा, स्वप्नील होबळे यांनी काम पाहिले. स्पर्धेचे हे दूसरे वर्ष होते. यामध्ये चोवीस देशातील 36 ग्रँडमास्टर सहभागी झाले होते.