मुंबई- कोरोनाविरोधात लढ्यासाठी दानशूरांचे हात सरसावले असून मदतीचा ओघ सुरू आहे. अशात भारताच्या एका १५ वर्षीय खेळाडूंने या कामी मदत करण्यासाठी पैसे नसल्याने, कारकीर्दित जिंकलेली पदके विकल्याचे समोर आले आहे. त्या खेळाडूने विक्रीतून मिळालेली रक्कम कोरोना लढ्यासाठी दिली आहे. दरम्यान, त्या खेळाडूचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्यासाठी मदत करा, असे आवाहन केले आहे. त्याच्या या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत असून अनेक दानशूर व्यक्तींनी मदत दिली आहे. भारतीय १५ वर्षीय गोल्फपटू अर्जून भाटी याने कोरोना लढ्याच्या मदतीसाठी, जिंकलेली १०२ पदकं विकली आहेत. यातून मिळालेली ४.३० लाख रुपयांची रक्कम त्याने पंतप्रधान सहाय्यता निधीत जमाही केली. यात तीन विश्व गोल्फ चॅम्पियन्सशीपची पदकं होती आणि अन्य राष्ट्रीय जेतेपदं होती.
या संदर्भात अर्जूनने ट्विट केले आहे त्यात तो म्हणतो, 'मी गेल्या ८ वर्षांत १०२ चषकं जिंकली आहेत. ती सर्व चषकं विकून मी ४.३० लाखांचा निधी जमा केला आहे आणि तो मी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिला आहे. हे ऐकून माझी आजी रडली आणि म्हणाली, तु खरंच अर्जुन आहे. आज देशातील लोक वाचले पाहिजेत, चषकं तर पुन्हाही मिळवशील.'