मुंबई -नुकत्याच पार पडलेल्या जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत एका १४ वर्षाच्या मुलाने पराक्रम करून दाखवला. या स्पर्धेच्या १८ वर्षाखालील वयोगटात १४ वर्षाच्या आर. प्रग्गनानंधाने विजेतेपद पटकावले आहे.
हेही वाचा -हॉकी : भारताचा मलेशियाला दे धक्का, जोहोर कपमध्ये ४-२ ने मात
जागतिक युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या ट्विटर अकाऊटंवरून प्रग्गनानंधाचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओमध्ये तो सुवर्णपदक स्वीकारताना दिसत आहे. 'आर. प्रग्गनानंधाने १८ वर्षाखालील वयोगटात वैयक्तित पहिले सुवर्णपदक जिंकले', असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रग्गनानंधाने ९/११ असे गुण मिळवत सुवर्णपद जिंकले. चेस डॉट कॉम इंडियानेही प्रग्गनानंधाचे कौतुक केले. '१८ वर्षाखालील वयोगटातील सुवर्णपदकासाठी खुप अभिनंदन', असे चेस डॉट कॉम इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रग्गनानंधाला ग्रँडमास्टर किताब मिळाला असून तो भारताचा सर्वात युवा ग्रँडमास्टर ठरला आहे. विशेष म्हणजे भारताचा महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ग्रँडमास्टर ही पदवी जिंकली होती. तर, २०१३ मध्ये जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आनंदला पराभूत करणारा आणि आता बुद्धिबळ जगावर राज्य करणारा मॅग्नस कार्लसन वयाच्या १३ व्या वर्षी ग्रँडमास्टर झाला होता.