नवी दिल्ली - अनुभवी देवेंद्र झाझरिया आणि विश्व चॅम्पियन संदीप चौधरीसह 5 भालाफेकपटू आणि इतर अॅथलिट मिळून 12 सदस्यीय भारतीय संघ टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी आज बुधवारी रवाना झाला आहे. दरम्यान टोकियो पॅराऑलिम्पिकला काल मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. मंगळवारी सायंकाळी उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.
टोकियोसाठी रवाना झालेल्या 12 सदस्यीय संघात निषाद कुमार, रामपाल आणि योगेश कथुनिया यांचा समावेश आहे. निषाद उंच उडीत, रामपाल थाळीफेक क्रीडा प्रकारात भाग घेणार आहे. तर योगेश अॅथलिट आहे.
देवेंद्र झाझरिया टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याने एथेन्स आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच त्याने जूनमध्ये पार पडलेल्या पात्रता फेरीत 65.71 मीटर लांब भाला फेकत आपल्याच विश्वविक्रमी कामगिरीत सुधारणा केली होती.
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये देवेंद्र झाझरियाला आपल्याच देशाच्या अजित सिंह आणि सुंदर गुर्जर यांचे आव्हान मिळू शकते. नशिबाची साथ राहिली तर भारत या स्पर्धेतील पुरूष भालाफेक एफ-16 खेळामध्ये तीन पदक जिंकू शकतो.