मुंबई - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ राणी रामपालच्या नेतृत्वात खेळणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. हॉकी इंडियाने याची घोषणा आज केली. टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. दरम्यान, राणीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१८ मध्ये लंडन येथे झालेल्या एफआयएच महिला विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्यादां उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता ऑलिम्पिकमध्ये संघाच्या कामगिरी सर्वांच्या नजरा आहेत.
टोकियो ऑलिम्पिकसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. परंतु, संघाचे नेतृत्व कोणाकडे सोपवण्यात येणार हे स्पष्ट नव्हते. आज याबाबतची घोषणा करण्यात आली. राणीच्या नेतृत्वात भारतीय संघ टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे.
राणीने यावर प्रतिक्रिया दिली असून तिने हॉकी इंडियाचे आभार मानले आहेत. ती म्हणाली. ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे ही बाब माझ्यासाठी सन्मानाची आहे. वर्षानुवर्षे कर्णधार म्हणून मी भूमिका निभावल्याने हे सुलभ होईल. मी या जबाबदारीसाठी तयार आहे आणि हॉकी इंडियाने मला हा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.'