भुवनेश्वर -भारतातल्या हॉकीप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२३ ची पुरूषांची हॉकी विश्वकरंडक स्पर्धा ओडिशामध्ये रंगणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली. राजधानी भुवनेश्वर आणि राउरकेला येथे विश्वकरंडक स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.
हेही वाचा -ऑलिम्पिकपूर्वी रशियाला मोठा धक्का, ४ वर्षाच्या बंदीची शक्यता
यापूर्वी २०१८ मध्ये पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले होते. ही विश्वकरंडक स्पर्धा बेल्जियमने जिंकली होती. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत, मलेशिया आणि बेल्जियम यांनी जोर लावला होता. मात्र, शेवटी भारताने बाजी मारली.
'ओडिशा हे विश्व हॉकीचे जागतिक केंद्र बनले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २०२३ मध्ये पुन्हा एकदा भुवनेश्वर आणि राउरकेलामध्ये चाहत्यांना हॉकीचा आनंद घेता येईल', असे पटनायक यांनी म्हटले. १३ ते २९ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.