रुरकेला - देशातील सर्वात मोठे हॉकीचे स्टेडियम ओडिशा राज्यात उभे राहत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी मंगळवारी (16 फेब्रुवारी) सुंदरगड जिल्ह्याच्या दौर्यावेळी रुरकेला शहरातील या हॉकी स्टेडियमची पायाभरणी केली.
हॉकी विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन
स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचे नाव स्टेडियमला देण्यात येणार आहे. येथील स्टेडियम आणि भुवनेश्वरमधील कलिंगा हॉकी स्टेडियम हे 2023साली होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषकाचे संयुक्तपणे आयोजन करणार आहेत.
20 हजार आसनक्षमता
बिजू पटनाईक युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी (बीपीयूटी) परिसरातील 15 एकर जागेवर हे स्टेडियम विकसित होणार आहे. जवळपास 20 हजार आसनांसह इतर सुविधा यात देण्यात येणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्री पटनाईक यांनी सुंदरगड जिल्ह्यातील 4 हजार 915 कोटी रुपयांच्या विकासकामांचाही यावेळी शुभारंभ केला.
विविध प्रकल्पांचा शुभारंभ
1 हजार 611 कोटी रुपयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प, 320 कोटींचा सिंचन प्रकल्प, १११ कोटी रुपयांचा आरोग्य सेवा प्रकल्प, पूल आणि रस्त्यांचा 1 हजार 60 कोटी रुपयांचा, 366 कोटींचा शैक्षणिक, स्वच्छतेसाठीचा 250 कोटी रुपयांचा, पायाभूत सुविधांचा 216 कोटी रुपयांचा, स्मार्ट सिटीचा 471 कोटी, 38 कोटींचा वीज, पायाभूत सुविधांचा 67 कोटी, महिला व बालकल्याणचा 135 कोटी, स्वच्छ पर्यावरणाचा 12 कोटी, कौशल्य विकासाचा 15 कोटी आणि क्रीडा सुविधांसाठीचा 120 कोटी अशा विविध प्रकल्पांचा शुभारंभही मुख्यमंत्री पटनाईक यांनी केला.