टोकियो -ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत न्यूझीलंड पुरुष संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला. न्यूझीलंडने भारतावर २-१ ने मात केली. हा सामना ओई हॉकी स्टेडियमवर पार पडला.
भारताचा ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल केला. पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या या संधीमुळे भारताला आघाडी घेता आली. पण, सामन्याच्या अंतिम वेळेत दोन गोल करून न्यूझीलंडने सामना खिशात घातला.
सामन्याच्या सहाव्या मिनिटाला अजून एक पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र, या संधीचा भारताला फायदा उठवता आला नाही. न्यूझीलंडकडून जॅबक स्मिथने ४७ व्या तर, सैल लेनने ६० व्या मिनिटाला गोल करत संघाला विजयासमीप नेले. या पराभवासह भारत गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा पुढील सामना मंगळवारी जपानसोबत होणार आहे.
याच स्पर्धेत भारतीय महिला संघ नेत्रदीपक कामगिरी केली आहे. भारतीय संघाने, दिग्गज ऑस्ट्रेलियाविरुध्दचा झालेला रोमांचक सामना बरोबरीत सोडवला. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना यजमान जपानविरुध्द झाला होता. या सामन्यात भारताने जपानला २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २-२ ने बरोबरीत रोखले.