हरिद्वार- भारतीय महिला हॉकी संघाची खेळाडू वंदना कटारियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली. तिने या स्पर्धेत हॅट्ट्रिक गोल केला. या कामगिरीमुळे उत्तराखंड सरकारने तिला, तीलू रौतेली पुरस्कारासह 25 लाख रुपयांचे बक्षिस देत सन्मान केला. आता उत्तराखंड सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे.
उत्तराखंड सरकार रोशनाबाद येथील हॉकी स्टेडियमला हॉकी स्टार वंदना कटारियाचे नाव देऊ शकतं. राज्यमंत्री स्वामी यतीश्र्वरानंद यांनी 13 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना या संदर्भात पत्र लिहलं आहे. यात त्यांनी वंदना कटारियाचे नाव स्टेडियमला देण्याची मागणी केली आहे.
स्वामी यतीश्र्वरानंद यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की, वंदना कटारियाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करत देश आणि राज्याचे नाव उज्वल केलं. ती युवा खेळाडूंसाठी आदर्श बनली आहे. हे सर्व पाहता हॉकी स्टेडियमचे नाव वंदना कटारिया हॉकी स्टेडियम केलं पाहिजे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी वंदना कटारियाच्या घरी जाऊन तिला तीलू रौतेली पुरस्काराने सन्मानित केले होते. यासोबत त्यांनी, तिला 25 लाख रुपयांचा चेक देखील दिला होता.