मुंबई - यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देशातील विवीध क्षेत्रातील खेळाडूंना जाहीर झाला आहे. नीरज चोप्रा ऍथलेटिक्स, रवी कुमार कुस्ती यांच्यासह १२ खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. 13 नोव्हेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बहुप्रतिक्षेत असलेल्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेत्यांची यादी खेल मंत्रालयाने अखेर प्रसिद्ध केली.
आतापर्यंत 45 जणांना पुरस्कार
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील मेजर ध्यानचंद हे हॉकीच्या इतिहासातील एक उत्तम खेळाडू म्हणून ओळखले जातात. 1928, 1932 आणि 1936 या काळात आयोजित केलेल्या ऑलम्पिक स्पर्धेत हॉकी खेळात भारताने तब्बल तीन सुवर्णपदके जिंकली होती. भारतात त्यांच्या नावाने दिला जाणारा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा खेळातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. खेळात दैदिप्यमान आणि अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. 1991-92 पासून देण्यास सुरुवात केलेला हा पुरस्कार आतापर्यंत 45 जणांना दिला आहे. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे पुरस्कार जिंकणारे पहिले खेळाडू होते.