टोकियो -ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. गटसाखळीच्या शेवटच्या सामन्यात भारताने चीनसोबत बरोबरी राखली. या सामन्यात एकही गोल होऊ शकला नाही.
तीन सामन्यांमध्ये भारताने पाच गुण झाले असून या टायसोबत भारताने आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे. ओई हॉकी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी सुरुवातीपासूनच चीनवर दबाव टाकला. भारताच्या सविताने शानदार बचाव करत चीनला रोखले.
सामन्याच्या आठव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, गुरजीत कौरला तो साधता आला नाही. दुसऱ्या सत्रातही मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा लाभ मिळवण्यात गुरजीत अपयशी ठरली. अंतिम फेरी गाठण्यासाठी चीनला हा विजय हवा होता. मात्र, भारताची गोलकीपर सविताने केलेल्या बचावामुळे चीनला अपयश आले.
याआधी, दिग्गज ऑस्ट्रेलियाविरुध्दचा झालेला रोमांचक सामना भारताने बरोबरीत सोडवला होता. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना यजमान जपानविरुध्द झाला होता. या सामन्यात भारताने जपानला २-१ ने पराभूत केले होते. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला २-२ ने बरोबरीत रोखले होते.