नवी दिल्ली -२०२१ मध्ये होणार्या एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) सोमवारी भारताच्या यजमानपदाची घोषणा केली. २०२१ च्या शेवटी ही स्पर्धा खेळवली जाईल. यापूर्वी भारताने २०१६ मध्ये उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा आणि २०१८ मध्ये ओडिशाच्या कलिंग स्टेडियममध्ये एफआयएच वरिष्ठ पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केले होते.
हेही वाचा -विराटचा नवा विक्रम, हॉलिवूडच्या अभिनेत्रीला टाकले मागे
एफआयएच ज्युनियर पुरुष हॉकी विश्वचषक २०२१ स्पर्धेमध्ये जगभरातील १६ संघ सहभागी होतील. युरोपमधील सहा , गतविजेत्या भारतासह आशियाचे चार, आफ्रिकेचे दोन आणि ओशिनिया व यूएसएचे प्रत्येकी दोन संघ यात सहभागी होतील.
या स्पर्धेसाठी युरोपमधील सहा सहभागी संघांनी यापूर्वी पात्रता दर्शविली आहे. यामध्ये जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड्स, स्पेन, बेल्जियम आणि फ्रान्सचा समावेश आहे. गतविजेत्या भारताने २०१६ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बेल्जियमला २-१ असे हरवून दुसऱ्यांदा जेतेपद जिंकले होते. या स्पर्धेचे ठिकाण व तारखांची घोषणा नंतर केली जाईल, असे एफआयएचने सांगितले आहे.