भुवनेश्वर - पहिल्या सामन्यातील पराभवानंतर शानदार पुनरागमन करत जगजेता बेल्जियमने दुसऱ्या सामन्यात भारताचा पराभव केला. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात बेल्जियमने भारताला ३-२ ने मात दिली. हरमनप्रीत सिंगने बचावात केलेल्या ढिसाळ कामगिरीमुळे भारताला 'एफआयएच' प्रो हॉकी लीगमध्ये पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले.
बेल्जियमने दुसऱ्या मिनिटाला गोल करत आपले मनसुबे जाहीर केले. अॅलेक्झाडर हेंड्रिक्सने पहिला गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. तेव्हा भारताकडून सागर प्रसादने गोल करत सामना १-१ अशा बरोबरीत राखला.
दुसऱ्या सत्रात १७ व्या मिनिटाला डी केर्पेलने गोल करत बेल्जियमला आघाडी मिळवली. तेव्हा अमित रोहिदासने गोल करत २-२ अशी बरोबरी साधत बेल्जियमला चोख प्रत्युत्तर दिले. पण हरमनप्रीतकडून झालेल्या चुकीचा फायदा उठवत बेल्जियमने सामन्यात तिसरा गोल केला आणि याच गोलच्या जोरावर भारताला ३-२ असे नमवून शनिवारच्या पराभवाची परतफेड केली.
भारत विरुद्ध बेल्जियम सामन्याचा निकाल... दरम्यान भारताने शनिवारी झालेल्या सामन्यात बेल्जियमचा २-१ ने पराभव केला होता. बेल्जियमने या स्पर्धेत ६ पैकी ४ सामन्यात विजय मिळवत १४ गुणांसह गुणातालिकेत अग्रस्थान पटकावले आहे. भारताने ४ पैकी ३ सामने जिंकले असून भारत ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर नेदरलँड्स चार सामन्यांतून ७ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
FIH Pro League मध्ये भारताची कामगिरी FIH Pro League : भारताचा जगजेत्त्या बेल्जियमला धक्का