चंदीगड- ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे आज (सोमवार) मोहालीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ८ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
बलबीर सिंग १९४८, १९५२ आणि १९५६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते १९५२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक बनले होते. या स्पर्धेत भारताने एकूण १३ गोल केले. यातील तब्बल ९ गोल बलबीर यांनी केले. यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील हॅट्ट्रिकचा समावेश आहे. नेदरलँडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी ५ गोल केले. अंतिम सामन्यात एका खेळाडूंने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. हा एक विक्रम आहे. आजघडीपर्यंत कोणत्याही हॉकीपटूला हा विक्रम मोडता आला नाही. भारताने हा सामना ६-१ ने जिंकला होता.
बलबीर यांना १९५६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना १९५७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. दरम्यान, बलबीर सिंग १९७५ सालच्या विश्व कप विजेत्या संघाचे, संघ मॅनेजरही होते. या संघाचे नेतृत्व अजीत पाल सिंग यांनी केले.