इंफाळ - भारतीय महिला हॉकी संघात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणारी माजी कर्णधार वाइखोम सूरज लता देवी यांनी त्यांच्या पतीविरोधात घरगुती हिंसाचार, शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची माहिती दिली आहे.
भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार वाइखोम सूरज लता देवी '२००५ मध्ये लग्न झाल्यापासून माझा पती हुंड्यासाठी छळ करत आहे', असे सूरज लता देवीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. वाइखोम यांच्यावर २००७ साली बॉलिवूडमध्ये 'चक दे इंडिया' हा चित्रपट तयार करण्यात आला होता. हा चित्रपट सूरज लता देवीने नेतृत्व केलेल्या भारतीय संघावर प्रेरित होता.
हेही वाचा -भारताचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा क्रिकेटमधून निवृत्त
सूरज लता देवीच्या नेतृत्वात भारतीय संघाने २००२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत, २००३ मधील आफ्रो-आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि २००४ मधील हॉकी एशिया कपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 'चक दे इंडिया' हा बॉलिवूड चित्रपट राष्ट्रकुल स्पर्धेतील विजयावर आधारित आहे.
'मी जेव्हा लग्नानंतर माझी पदके घेऊन गेली तेव्हा नवऱ्याने मला या पदकांचा काय फायदा आहे? असे विचारले होते. अनैतिक आचरणामुळे तुला अर्जुन पुरस्कार मिळाल्याचेही नवरा म्हणाला होता. हे प्रकार मी सर्वांसमोर आणणार नव्हते. पण, संयमाची एक मर्यादा असते', असे ३९ वर्षीय सूरज लता देवीने म्हटले आहे.