भुवनेश्वर- भारताच्या पुरुष हॉकी संघाने, 'एफआयएच' प्रो लीगमध्ये नेदरलँडचा सलग दुसरा पराभव केला. भारताने रविवारी रोमांचक सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडला ३-१ ने धूळ चारत दोन गुणांची कमाई केली.
भारताने नेदरलँडला मुख्य सामन्यात ३-३ ने बरोबरीत रोखले. एकवेळ भारतीय संघ तिसऱ्या सत्राअखेरीस १-३ ने पिछाडीवर होता. तेव्हा मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने चौथ्या सत्रात दिमाखदार पुनरागमन करीत बरोबरी साधली.
सामन्याच्या २४ व्या मिनिटाला वीरर्डेन व्हॅन डर मिंक याने गोल करत नेदरलँडला १-० ने आघाडी मिळवून दिली. तेव्हा २५ व्या मिनिटाला ललित उपाध्यायने भारताचे खाते उघडले. भारताचे खाते उघडल्यानंतर अवघ्या २ मिनिटात नेदरलँडने दोन गोल डागले.
जेरॉन हर्ट्झबर्गर (२६ व्या मिनिटाला) आणि बोर्न कीलीरमॅन (२७व्या मिनिटाला) यांनी दुसऱ्या सत्रात साकारलेल्या गोलमुळे नेदरलँडने मध्यांतराला आघाडी मिळवली होती. त्यानंतर ५१ व्या मिनिटाला मनदीप सिंगने आणि ५५ व्या मिनिटाला रुपिंदर सिंग यांनी महत्त्वाचा गोल साधला.
दरम्यान, भारताने नेदरलँडला मुख्य सामन्यात ३-३ असे बरोबरीत रोखल्याने, नेदरलँडला एक गुण मिळाला. भारताने शनिवारी नेदरलँडवर ५-२ असा धक्कादायक विजय मिळवला होता. त्यामुळे दोन सामन्यांद्वारे भारताने गुणतालिकेत एकूण ५ गुण प्राप्त केले आहेत.
हेही वाचा -FIH Pro League: नेदरलँडला लोळवलं, गुरजंतने केला भारतीय हॉकी इतिहासातील वेगवान गोल
हेही वाचा -भारतीय हॉकी संघाची डिफेंडर सुनिता लाकडाची निवृत्ती