लंडन -इंग्लिश फुटबॉल लीग (ईएफएल) क्लब फुलहॅमच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ''जे खेळाडू पॉझिटिव्ह आढळले आहेत, ते क्वारंटाईन असतील. ज्यांचे अहवाल नेगेटिव्ह आले आहेत, त्यांना मैदानात सराव करण्याची परवानगी मिळणार आहे'', असे ईएफएलने सांगितले.
"पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही खेळाडू आपली नावे जाहीर करणार नाहीत आणि आता स्वत: ला क्वारंटाईन करतील", असे फुलहॅमने सांगितले. पुढच्या महिन्यात ईएफएल लीग सुरू होण्याची अपेक्षा आहे.
सोमवार ते बुधवारदरम्यान सुमारे 1030 खेळाडू आणि क्रीडा कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी, इंग्लिश प्रीमियर लीगमधील (ईपीएल) चार जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 3 लाख 46 हजार 688 कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरात 54 लाख 98 हजार 580 कोरोनाबाधित आढळले असून 3 लाख 46 हजार 688 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 23 लाख 2 हजार 27 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत.