नवी दिल्ली -जगभरात हातपाय पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठ्या स्पर्धा रद्द झाल्या आहेत. तर, काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. अशातच फुटबॉल विश्वातील महत्त्वाची असलेली इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धाही ३० एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
हेही वाचा -कोरोना असला तरी आयपीएलमध्ये खेळणार 'हा' दिग्गज फलंदाज
'सर्व प्रकारच्या व्यावसायिक सामन्यांचे निलंबन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. एफए, इंग्लिश प्रीमियर लीग, इंग्लिश फुटबॉल लीग आणि महिला व्यावसायिक संघटनेच्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. यापूर्वी ही तारीख ३ एप्रिलपर्यंत ठेवण्यात आली होती, परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे ही तारीख आणखी वाढवण्यात आली आहे', असे इंग्लिश फुटबॉल असोसिएशनने म्हटले आहे.
कोरोनाचे सावट उन्हाळ्यापर्यंत कमी न झाल्यास ऑलिम्पिकचे निर्धारित वेळापत्रक स्थगित केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विषाणूच्या फैलावामुळे मानाची समजली जाणारी युरो चषक फुटबॉल स्पर्धा यंदाच्या वर्षी न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा २०२१ मध्ये होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण याबाबत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने खुलासा केलेला नाही. पण स्वीडनच्या फुटबॉल संघटनेने मात्र युरो चषक पुढे ढकलणार असल्याचे स्पष्ट केले आहे.