नवी दिल्ली -अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगभरात निषेध सुरू झाला. वर्णद्वेषाविरोधात होणार्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आवाज उठवला. आता भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीनेही आपले मत दिले.
वर्णद्वेषाच्या घटनांबद्दल विचारले असता छेत्री म्हणाला, "इतरांप्रमाणेच मलाही याबद्दल वाईट वाटते. हे खूप वाईट आहे." लोकांना हे माहित नसते. कधीकधी ते अज्ञानामुळे होते. जर आपल्याला वांशिक भाष्य करणारा कोणी आढळला, तर त्याला गोष्टींची जाणीव नसल्याचे आपल्याला कळते. पण, असे केले जाऊ नये. लोक या विषयावर जेवढे जास्त जागरूक होतील, तेवढी प्रकरणे कमी होतील.''
गप्पांदरम्यान छेत्रीने आपल्या निवृत्तीबद्दलही चर्चा केली. एका प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाले, ''मी किती काळ खेळणार हे मी सांगू शकत नाही. पण, मी माझ्या खेळाचा संपूर्ण आनंद घेत आहे आणि मी कुठेही जाणार नाही.'' छेत्रीने आणखी तीन ते चार वर्षे खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये शुक्रवारी छेत्रीने आपल्या कारकिर्दीची 15 वर्षे पूर्ण केली. 2005 मध्ये क्वेटामध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 115 सामने खेळले असून 72 गोल केले आहेत. सध्याच्या फुटबॉलपटूंमध्ये पोर्तुगालच्या रोनाल्डोनंतर छेत्रीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गोल केले आहेत. तो लिओनेल मेस्सीच्या पुढे आहे.
छेत्री म्हणाला, "देशासाठी 15 वर्षे खेळणे आनंददायक आहे. मी आणखी तीन ते चार वर्षे खेळू शकलो तर 20 वर्षे होतील. 20 वर्षे खेळू शकेल याचा विचार नव्हता. हे अगदी स्वप्नासारखे आहे.''