नवी दिल्ली -इटलीचा आघाडीचा क्लब जुव्हेंटसकडून खेळणारा पोर्तुगीज 'सुपरस्टार' ख्रिस्तियानो रोनाल्डोने गेल्या दशकात अनेक विक्रमांची नोंद केली. आता नवीन दशकाची नांदी आहे आणि या दशकात रोनाल्डोला अनेक आणि महत्त्वाचे विक्रम खुणावत आहेत.
हेही वाचा -रणजी ट्रॉफी : महाराष्ट्राचा एक डाव आणि ९४ धावांनी पराभव
चॅम्पियन्स लीगमधील सर्वाधिक हॅटट्रिक आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलकडे रोनाल्डोची विशेष नजर असणार आहे. शिवाय, २००३ मध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या रोनाल्डोला जुव्हेंटसकडून खेळताना चॅम्पियन्स लीगचे जेतेपदही खुणावते आहे. १९९५-९६ नंतर, या क्लबला लीगचे जेतेपद जिंकता आलेले नाही.
रोनाल्डोला खुणावत असलेले मोठे विक्रम -
⦁ चॅम्पियन्स लीगचे सर्वाधिक वेळा विजेतेपद -
२०१८ मध्ये स्पॅनिश दिग्गज रिअल माद्रिदने जेव्हा इंग्लिश प्रीमियर लीग क्लब लिव्हरपूलला पराभूत करून चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकले तेव्हा रोनाल्डोचे ते पाचवे विजेतेपद नोंदवले गेले होते. आता जुव्हेंटसला युरोपच्या या सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेचे विजेतेपद पटकावता आले तर, त्याचे हे सहावे विजेतेपद असेल. या विजेतपदासह रोनाल्डो फ्रान्सिस्को गेंटों यांच्या विक्रमाशी बरोबरी करेल. रिअल माद्रिदकडून खेळताना गेंटो यांनी १९५६-६६ या कालावधीत सहा वेळा लीगचे विजेतेपद पटकावले होते.