नवी दिल्ली -क्रीडाविश्वातील अनेक दिग्गज खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांच्या भन्नाट गोष्टी आपण नेहमी ऐकत असतो. या खेळाडूंसाठी चाहते काय आणि किती करू शकतात याचा अंदाज बांधणे खरंच कठीण आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचेही जगभरात असंख्य चाहते आहेत. याच चाहत्यांपैकी काही चाहत्यांनी इटलीमध्ये 'रोनाल्डोप्रेम' सिद्ध केले.
हेही वाचा -'बीसीसीआयने खेळाडूंवर कारवाई करावी', भारताच्या दिग्गज कर्णधारांची प्रतिक्रिया
इटलीच्या वियारिजियो येथे रोनाल्डोचा भव्य पुतळा बनवण्यात आला. हा पुतळा कागदाचा असून तो चार मजली उंच इमारतीएवढा आहे. वियारिजियोमधील कॉर्निव्हल दरम्यान या पुतळ्याची परेड काढली गेली. हा कॉर्निव्हल जगभरातील लोकप्रिय व्यक्तींच्या देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. रोनाल्डोच्या पुतळ्याला चांदीसारखा रोबोट लूक देण्यात आला आहे.
यापूर्वी जानेवारीत पोर्तुगालमधील चॉकलेट उत्पादक जॉर्ज कार्डोसोने रोनाल्डोचा चॉकलेटचा पुतळा बनवला होता. हा पुतळा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. स्वित्झर्लंडच्या गिविसेज येथील चॉकलेट फॅक्टरीत हा १.८७ मीटर लांबीचा पुतळा बनवण्यासाठी १२० किलो चॉकलेट वापरण्यात आले होते.