दोहा - कोरोना विषाणूने संपूर्ण क्रीडाविश्वावर आपला विळखा घातला असून फुटबॉल विश्वातून चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कतार विश्वचषक स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर असलेला माजी फुटबॉलटू आदिल खामिस याला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्पर्धेच्या आयोजन समितीने दिली.
नोव्हेंबर-डिसेंबर २०२२ साली कतारमध्ये फीफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा होणार आहे. याआधी कतारकडून स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. याआधी स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असलेल्या ३ स्टेडियमच्या ८ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तरीही फिफा विश्वचषक स्पर्धेच्या तयारीची कामे अद्यापही सुरू आहेत.
या सर्व घडामोडीत आदिल खामिस (५४) याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आदिल कतारचा स्टार फुटबॉलपटू असून, त्याने वयाच्या १८ व्या वर्षीच कतारकडून आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. १९८३ साली आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केलेल्या आदिलने २००० साली निवृत्ती घेतली होती. त्याने सुदानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.