लुधियाना - पंजाबच्या फुटबॉल संघाने आतापर्यंत संतोष ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे. उपांत्य फेरीत पंजाबने गोव्याला 2-1 ने पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात पंजाबला सर्व्हिसेस फुटबॉल संघाच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सर्व्हिसेस फुटबॉल संघाने कर्नाटकला पराभूत करून अंतिम फेरी गाठली आहे.
सर्व्हिसेस आणि पंजाबचा संघ 2014-15 मध्ये संतोष ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात समोरासमोर आले होते. त्या सामन्यात निर्धारीत वेळेत सामना 0-0 असा बरोबरीत सुटला होता. मात्र पेनाल्टी शूटआऊटमध्ये सर्व्हिसेस संघाने 5-4 ने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.
बंगालच्या संघाने 1941-42 पासून खेळल्या जाणाऱ्या संतोष ट्रॉफीचे सर्वाधिक (32 वेळा) विजेतेपद पटकावले आहे. तर याबाबतीत पंजाब दुसऱ्या स्थानी आहे.