साओ पाउलो - अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू एमिलियानो मार्तिनेज, एमिलियानो ब्यूंडिया, जियोवान्नी लो सेस्सो आणि क्रिस्टियन रोमेरो यांच्यावर ब्राझील देशाचा कोरोना प्रोटोकॉल मोडल्याचा आरोप आहे. यामुळे या चार फुटबॉलपटूंची चौकशी ब्राझील फेडरल पोलीस करत आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण -
ब्राझील आणि अर्जेंटिना यांच्यात विश्वकप स्पर्धेच्या पात्रता फेरीतील सामना आयोजित होता. या स्पर्धेसाठी अर्जेंटिनाचे चार खेळाडू जे इंग्लंडमध्ये वास्तवाला होते, त्यांचा देखील अर्जेंटिना संघात समावेश होता. पण ब्राझील देशाच्या कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे त्या चार खेळाडूंना 14 दिवस क्वारंटाईन राहणे बंधनकारक होते. परंतु यातील तिघे ब्राझीलविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. तेव्हा स्थानिक पोलिसांनी थेट मैदानावर धाव घेत चालू सामना थांबवला.
आता या प्रकरणात चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. ब्राझील फेडरल पोलिसांनी सोमवारी सांगितलं की, त्या चार फुटबॉलपटूंना लेखी द्यावे लागेल. तेव्हाच त्यांना अर्जेंटिना संघासोबत रवाना होण्याची परवानगी मिळेल.